नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/ प्रतिनिधी – राज्यात दर दिवशी कुठे ना कुठे जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातील माण येथे एका दलित महिलेला रस्त्यात फरफटत नेऊन लाथा बुक्क्यांनी, काठी आणि उसाने अमानुष मारहाण झाल्याची अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संतापीत झालेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सोडणार नाही’ अशा कडक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावले आहे.
“साताऱ्यात एका दलित विधवेला ४ पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय? तर तीने वैरणीसाठी, म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी पैसे दिले होते पण, चारा न मिळाल्याने तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती म्हणून. तिला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी मला शब्द ही सापडत नाहीयेत. अगदीच क्रूर आणि अमानुष.” अशा शब्दात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्याच्या घटने संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटून आधार देणारा आणि मदतीला धाऊन जाणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. “आम्ही प्रभावीपणे हा मुद्दा मांडल्यामुळे या प्रकरणात ॲट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करावा लागला आणि त्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आमच्या स्थानिक नेतृत्वाने काल तहसीलदारांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. आजही हा न्यायचा लढा चालू ठेवत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.” असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
शेवटी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचत असतील अशी मी आशा करतो, कारण, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाहीत.” अशा शब्दात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले आहे.