नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. १७ ऑक्टोबर, २०२३ ते दि. ३० नोव्हेंबर, २०२३ या विशेष मोहिमेंतर्गत आगावू मतदार नोंदणी करता येणार आहे.
निवडणूका न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. त्यानुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असणारा कर्मचारी वृंदासोबत राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) सहाय्याने प्रत्यक्ष घरोघरी भेटी देवून पडताळणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत (H2H) तसेच ठाणे जिल्हयातील सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी हे विधानसभेच्या मतदारयादीसाठी मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (BLV) म्हणून कार्यरत असून त्यांच्या मदतीने मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम दि. ०५ ऑगस्ट २०२३ ते दि. १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात आला आहे.
मतदारांनी आपले नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इत्यादी तपशील मतदारयादीत तपासून ते अचूक आहेत का, याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदारयादीतील आपले तपाशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.
दि. १७ ऑक्टोबर, २०२३ ते दि. ३० नोव्हेंबर, २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे. सदर कालावधीत नवीन मतदार नोंदणी केलेल्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे आपल्या घरी भेट देणार असून त्यांना योग्य ते कागदपत्र / पुरावे देऊन सहकार्य करावे.
यंदाच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने वरील कालावधीतील दोन शनिवार व दोन रविवार या सुट्टीचे दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होवून अन्य गावात गेलेल्या विवाहित स्त्रियांच्या नावांची मतदारयादीतून वगळणी केली जाईल.
मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकाने दि. १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रारूप स्वरुपातील मतदारयादीतील आपले तपशील अचूक आहेत का, याची खात्री करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे श्री. अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.