नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – “आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजप-आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत #INDIAAlliance ची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या आघाडीत सामील करून घेण्याच्या निमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.
नुकतीच मुंबईत #INDIAAlliance ची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांना या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र सातत्याने भाजप – आर एस एस विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र मात्र या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते.
यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता ,”निमंत्रण पाठवायला #INDIAAlliance ची बैठक काय सत्यनारायणाची पूजा नाहीये.” असे उत्तर दिले होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये “#IndiaAlliance मध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?” असा थेट सवाल काँग्रेसला विचारला आहे. तसेच “लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.