नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सारसोळे गांवात नवीन सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरु करण्यात येत असून तेथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, ज्युनिअर के.जी., सिनिअर के.जी. तसेच इयत्ता पहिलीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. येथील प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क असल्यामुळे या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
पालकांना येथील प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरापलिकेच्या वतीने प्रवेशासाठी आवश्यक माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या प्रवेशामध्ये नर्सरीच्या प्रवेशासाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेबर 2020 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 3 वर्ष व कमाल वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. तसेच ज्युनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेबर 2019 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 4 वर्ष व कमाल वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे.
तसेच सिनिअर के.जी. वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 5 वर्ष व कमाल वय 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १ ली च्या वर्गातील प्रवेशासाठी 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 6 वर्ष व कमाल वय 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणे आवश्यक आहे. या चारही वर्गांकरिता प्रती वर्ग 30 विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्यासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रवेशासाठीचे अर्ज सारसोळे शाळेमध्ये 25 जुलै 2023 रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नि:शुल्क उपलब्ध आहेत.
हे अर्ज पालकांनी पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह 26 जुलै 2023 रोजी पर्यंत शाळेत सादर करणे आवश्यक आहे. शाळेत प्रवेश देतांना शाळेपासून 1 कि.मी अंतराच्या आत राहणाऱ्या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज असल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल. शाळेतील शिक्षण नि:शुल्क असून बससेवा उपलब्ध असणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावयाची आहे. अर्ज भरताना ज्या वर्गातील प्रवेशासाठी अर्ज भरला आहे त्याकरिता 31 डिसेंबर 2023 रोजी अटींमध्ये नमूद केलेले वय पूर्ण असणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण व्हिजन अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून सुसज्ज शाळा इमारती, प्रशिक्षित शिक्षक व विनामूल्य शैक्षणिक साहित्य पुरवठा ही महानगरपालिका शाळांची वैशिष्ट्ये आहेत. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन शाळा प्रवेशासाठी आवश्यक नियम व अटींमध्ये बसणाऱ्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.