नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/ प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित यावल, सावदा तालुका रावेर ही पतसंस्था अवसायानात निघाल्याने सदर संस्थेच्या गाळ्याची अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सखाराम कडू ठाकरे या विशेष लेखापरीक्षकाला धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे बस स्थानकात रंगेहात अटक केली असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, धुळे अँटी करप्शन ब्युरोचे या कारवाईने धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित यावल सावदा तालुका रावेर ही पतसंस्था अवसायानात निघाल्याने या संस्थेचे राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल सावदा येथील कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक सखाराम ठाकरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती, याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे बस स्थानक येथे सापळा रचून धुळे येथील सहकारी संस्थेचे विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करून बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.