नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे प्रतिनिधी – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला धुळ्यात युवासेना ठाकरे गटाच्या वतीने जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर हे जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
शिंदे गट शिवसेनेच्या वतीने रविवारी औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंग मंदिरात पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करताना आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे शिरसाठ यांचे वक्तव्य होते, त्यांच्या याच वक्तव्यावरून ठाकरे गटात महिला आघाडी, युवासेना संतप्त झाली असून, रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.असे आंदोलन कर्त्यांनी सागितले.
आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकी व महिलांकडे बघण्याची त्यांची वृत्ती किती गलिच्छ व बरबटलेली आहे हे दाखवून दिले आहे. याचा पुरावा आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनास लज्जा वाटेल, असे वक्तव्य केल्यामुळे आज धुळे जिल्हा युवासेनेने शहरातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन संजय शिरसाठ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुढील काळात जर महाराष्ट्रातील महिलांविषयी कोणीही अशा प्रकारे टिप्पणी केली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.