नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – सध्या सगळीकडे लगीनसराई सुरू आहे. लग्न सोहळ्यात अनेकजण विनापरवाना मोठ्या आवाजात डिजे लावून त्यावर थीरकतात. अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे अनेकदा आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या घटणांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बुलढाणा पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असेल किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एसपी सुनील कडासणे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. आतापर्यंत 22 डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, 75 टक्के डेसिबल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा, मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासने म्हणाले.
डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच असणार आहे. समारंभ, सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.