नवी मुंबई/ प्रतिनिधी – मॉरेशियस मधून भारतात आलेल्या मित्राला दारूच्या नशेत त्याच्याच मित्राने ठार केले. मैत्रीला काळीमा फासणारी ही घटना नवी मुंबईतील पारसिक हील टेकडीवर घडली. त्यामुळे परिसरात दहशत माजली आहे. पारसिक हील टेकडीवर एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. पोलिस सर्वच बाजूंनी आरोपीची चौकशी करत होते.
तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही कॅमेरा यांच्या आधारे पोलिसांनी मृत अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून सखोल चौकशी केली. संशयित वीस वर्षीय मयत व्यक्तीच्या मित्राला ताब्यात घेतले असता त्याने आपल्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. मयत व्यक्ती परदेशी नागरिक असून, आपले त्याच्याशी मैत्रीचे संबंध होते. मृतक व्यक्तीबरोबर पार्टी करत असताना हा प्रकार घडला. मृतक व्यक्तीने अल्पवयीन मुलींशी छेडछाड केली. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने आणि दोन अल्पवयीन मुलींनी मिळून मृतकाला दगडाने ठेचून मारले. अशी कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांनी आरोपी सय्यद खान आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे.