नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – प्रतिबंदीत असलेल्या वनस्पतींची लागवड करून अवैधरित्या त्याची विक्री केल्यास कायद्याने तो गुन्हा आहे. आरोपीला कायद्याने शिक्षा होवू शकते असे असताना देखील, काही ठिकाणी नफ्याचा विचार करून, अवैध वनस्पतींची लागवड व विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळते. सध्या संभाजीनगर येथे असा प्रकार उघडकीस आला आहे.सिल्लोड तालुक्यात एक महिन्यानंतर गांजा लागवड केल्याची ही दुसरी घटना घडली आहे.
उपळी शिवारातील गट क्रमांक 69 मधील कपाशी व तुरीच्या शेतात अवैधरित्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारून अवैधरित्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडे आढळली आहेत.. 31.20 किलो ग्राम वजनाची, 1 लाख 87 हजार 920 रुपये कीमतीची गांजाची झाडे आढळून आली. या गुन्ह्यातील आरोपींना सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.