नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तुल बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेल मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाने त्वरीत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुनिल रमेश जाधव रा. पिंपळदेवी नगर मोहाडी उपनगर धुळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस असा एकूण ४२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईविषयी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी माहिती दिली . धुळे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुनिल रमेश जाधव हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत फिरत असतो व तो सध्या चाळीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्तश्रृंगी नगर येथे रस्त्यावर उभा आहे. त्यावरून पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्याला धुळे एलसीबी पथकास कारवाईसाठी रवाना केले. सुनिल जाधव याला पकडणार तोच पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. शिताफीने पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रूपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन हजार रूपये किंमतीचे दोन जीवंत काडतूस असा ४२ हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
याप्रकरणी शशिकांत देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार सुनिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुनिल जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खूनासह विविध गंभीर गुन्हे मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बारकुंड यांनी दिली आहे. तसेच सुनिल जाधव याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अर्थात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचेही अधिक्षकांनी म्हटले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक अमरजित मोरे, हेकॉ अशोक पाटील, पोना. मुकेश वाघ, पोकॉ. जितेंद्र वाघ, पोकॉ. हर्षल चौधरी, योगेश साळवे यांनी केली आहे.