नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – लेखा व्यवसाय हा तांत्रिक बदल आणि व्यवसाय मॉडेलशी सुसंगत असायला हवा आणि 21 व्या शतकातील नवीन व्यवसाय पद्धती स्वीकारायला हव्यात असे भारताचे नियंत्रक आणि महा लेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू म्हणाले. मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या 21व्या जागतिक लेखापालांच्या संमेलनाला संबोधित करताना, कॅगने म्हटले की, व्यवसायात नवीन आणि अभिनव साधनांच्या उत्क्रांतीसह अर्थव्यवस्था मोठ्या परिवर्तनातून जात असल्यामुळे हे आवश्यक आहे आणि ते पारंपारिक लेखा परंपराना आव्हान देईल.
वेळ आणि पैशांचा अपव्यय न करता मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम पारदर्शकतेने करण्यासाठी आपल्याला शाश्वत माहिती तंत्रज्ञान प्रशासन आणि विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन आवश्यक असल्याचं कॅगने म्हटले आहे. लेखा आणि लेखापरीक्षण व्यावसायिकांनी सरकारच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी या घडामोडींची नोंद घेणे आवश्यक आहे. उच्च नैतिक, तांत्रिक आणि व्यावसायिक मानकांसह आपल्याला कर्तव्ये पार पाडायची आहेत असे ते म्हणाले.
शेकडो घरगुती, लघु आणि मध्यम उद्योग आणि तरुण उद्योजक युनिकॉर्न निर्माण करत असून हे सकारात्मक संकेत आहेत . त्यांना विशेषत: त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कायदेशीर आणि नियामक अनुपालनासाठी लेखा व्यवसायाकडून मार्गदर्शन आणि मदत लागू शकेल असे ते म्हणाले.
शाश्वत विकासाच्या मुद्द्याकडे यापुढे दुर्लक्ष केले जाऊ नये . केवळ वैधता , योग्यता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासह शाश्वत विकासाबाबतही लेखापाल आणि लेखा परीक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे असे कॅगने म्हटले आहे .
मुर्मू म्हणाले की, कॅग संस्थेने लेखा परीक्षण नियोजन आणि पुरावे गोळा करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि भू-स्थानिक विश्लेषण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि माहिती प्रणाली, डेटा विश्लेषण आणि पर्यावरणीय ऑडिटसाठी संशोधन आणि क्षमता निर्मिती क्षेत्रातली प्रगती जागतिक दर्जाची आहे.
मुर्मू म्हणाले की कॅगचा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेशी दीर्घकाळ संबंध आहे. आम्ही लेखा आणि लेखापरीक्षणासाठी मानके विकसित करण्यासाठी आणि विविध समित्यांमध्ये दीर्घकाळ गुणवत्ता सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहोत .यामुळे केवळ आपल्या देशातील कंपनी प्रशासन पद्धती बळकट होणार नाही तर देशाची आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देखील मार्गदर्शन मिळेल असे ते पुढे म्हणाले.