नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण मंडपात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्हाभरातून हजारो मराठा समाज बांधव सामील झाले होते. मोर्चा पार पडल्यानंतर मोर्चेकरी आपापल्या वाहनाने गावाकडे निघाले होते.
खामगाव तालुक्यातील अटाळी येथील मराठा बांधव खामगावच्या दिशेने जात असलेल्या क्रुझर वाहनाला समोरून येणाऱ्या टँकरने धडक दिली. तर या क्रुझरच्या मागे असलेले दुचाकी चालक हे मागून क्रुझरला धडकले. या अपघातात पाच मोर्चेकरी जखमी झाले असून त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात बुलढाणा-खामगाव मार्गावरील भादोला सेंट जोसेफ शाळेजवळ घडला आहे. घटनेची माहिती मिळताच मोर्चाचे आयोजकांनी घटनास्थळी व जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली आहे.