नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मलंग रोड वर खड्याचे साम्राज्य असून हे खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जाते आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीस्वार या रस्त्याने जात होता. या दुचाकीस्वाराचा तोल गेला व तो थेट शेजारून जात असलेल्या डम्परच्या मागच्या चाका खाली आला. या अपघातात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.खड्डामुळे दुचाकीस्वार तरुणाचा बळी गेला आहे.याला प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो डम्परच्या मागच्या चाका खाली आल्याची आरोप प्रत्यक्षदर्शी यांनी केला आहे. मयत दुचाकी स्वाराचे नाव सुरज गवारी असे असून तो कल्याण पूर्व रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मध्ये अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते. महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जातो. खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली होती. खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते. यावर मनपा प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वाच लक्ष लागलं आहे.