सोलापूर/प्रतिनिधी – वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या उपचाराची सोय मोहोळ शहरात व्हावी. मोहोळ शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय थांबवण्यासाठी मोहोळ शहरात आणखी दोन नवे क्वारंटाईन सेंटर चालू करण्यात येणार आहेत. तसेच गंभीर रुग्णांना वेळेवर कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे. त्याचबरोबर आवश्यक त्या रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा सुद्धा मिळावी, यासाठी मोहोळ तालुका व शहारासाठी २५० ते ३५० बेडची क्षमता असलेले सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांनी दिली.
मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२० एप्रिल रोजी आमदार यशवंत माने, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोवीड केअर सेंटरच्या संभाव्य जागेची पाहणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या निधीतून एक कोटी रुपये कोवीड केअर सेंटरच्या उभारणीसाठी आणि कोवीड रुग्णांसाठी खर्च करण्यासाठी मंजुरी दिल्याने आता आमदार यशवंत माने यांच्या निधीतून एक कोटी रुपयांची साधनसामुग्री या कोवीड सेंटरला मिळू शकते, म्हणूनच संभाव्य जागेची पाहणी केली जात आहे, असेही आ. यशवंत माने यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त आडे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षिरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अरुण पाथरुडकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रल्हाद गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके आदिंसह अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते