नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कोल्हापुर/प्रतिनिधी – हलगीचा कडकडाट… घुंगराचा चाळ… शिंगाणा रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशीं आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केले जातात. ही जुनी पंरपरा गेली अनेक वर्षं कोल्हापूरने जपली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदा ही हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडला कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळ पासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती.
दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो. सकाळी पंचगंगा नदीवर म्हशी आंघोळ घातली जाते. त्यानंतर सुशोभित केलेल्या म्हशी कसबा बावडा येथे येतात. म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात व पायात घुंगराची माळ, शिंगांवर मोरपीसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले. मोटरसायकल सायलेंसर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हैस पळवणे, झेंडा दाखवत अशा विविध स्पर्धा भरवल्या जातात.कोल्हापुरातील कसबा बावडा, शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, पाचगाव या ठिकाणी पाडवा तसेच भाऊबीजेच्या दिवशी हे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केले जातात. हे पाहण्यासाठी शहरवासीयांची ही मोठी गर्दी झालेली असते.