अमरावती/प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील डवरगाव मार्गावर अचानक चालत्या ट्रकला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने काही क्षणातच ट्रकची राख केली. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून नजीकच असलेल्या विश्वमानव मंदिर दासटेकडी डवरगाव परिसरात ही घटना घडल्याने लोकांची तारांबळ उडाली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. यावेळी ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रकचालक तात्काळ बाहेर पडला. काही वेळातच पूर्ण ट्रकने पेट घेतला.
यादरम्यान नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रक क्रमांक एमएच 34 बी झेड 4325 हा 12 चाकी ट्रक चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून 40 टन कोळसा घेऊन डवरगाव मार्गावरील इंडिया बुल्स कंपनीकडे जाताना हा भयंकर प्रकार घडला.