बीड/प्रतिनिधी – जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाळुंज गावच्या पारधी समाजाच्या महिलेची गायरान जमिनीच्या वादातून प्रस्थापित भाजप आमदार सुरेश धस आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून नग्न धींड काढण्यात आली होती. त्या संदर्भात पीडित कुटुंबाची वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भेट घेतली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वाळुंज नावाच्या गावामध्ये पारधी वस्ती वरती स्थानिक प्रस्थापित भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याकडून गायरान जमिनीच्या वादातून वादावादी करण्यात आली. संबंधित गायरान जमीन जवळपास तीन पिढ्यापासूनसंबंधित भोसले नामक पारधी कुटुंबीय कसत आहे. ही जमीन एका तलावापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या जमिनीवरती प्रस्थापित भाजप आमदाराचा डोळा आहे. त्या दृष्टिकोनातून आमदाराच्या कार्यकर्त्याकडून त्या पारधी कुटुंबावरती हल्ला करण्यात आला व त्या ठिकाणच्या एका महिलेची नग्न दिंड काढण्यात आली.अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हा सर्व प्रकार घडत असताना भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. सदरील प्रकरणासंदर्भात पीडित कुटुंबीय पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यावतीने त्या प्रस्थापित भाजप आमदार व त्याच्या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.असे यावेळी सांगण्यात आले.
संबंधित सर्व प्रकार ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर गेला असता त्यांनी तात्काळ प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण सरांना सूचना दिली की आपण शिष्टमंडळासहित संबंधित घटनास्थळीत जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करून माहिती घ्यावी. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी संबंधित प्रकरणांमध्ये पुढील रणनीती ठरवेल. यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचा शिष्टमंडळ किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये पीडित कुटुंबीयांची व पोलीस स्टेशनची भेट घेतली व सविस्तर माहिती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना कळवले.
संबंधित घटने संदर्भात पक्षाची पुढील भूमिका ऍड बाळासाहेब आंबेडकर व प्रा किसन चव्हाण सर लवकरच घोषित करतील. यावेळी भटक्या विमुक्त समिती राज्य समन्वयक अरुण राज्य तक्रार निवारण समिती प्रमुख विष्णू जाधव सर,बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,जिल्हा संघटक धम्मानंद साळवे,प्रशांत बोराडे,दिलीप माने,बाळासाहेब गायकवाड,सचिन मेघडंबर,गणेश खेमाडे,रूपेश बोराडे,अमोल साखरे, बाळू गायकवाड,कृष्णा गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.