नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्ल्यानी गावात मुंबई-वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई-वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे. या मोरीजवळ साचलेल्या सांडपाण्यात तीन वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या मृत मुलीचे नाव रेहमुनीसा रियाज शहा असे आहे.
कल्याणजवळ असलेल्या बल्ल्यानी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात. बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे. या उरूसामध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शहा हे चांद शहा यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी रेहमूनिसा देखील होती. आज सकाळी रेहमूनिसा घरी दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह चाळी लगत असलेल्या मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात आढळून आला.
टिटवाळा पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. याआधी देखील खड्ड्यात पडून दोन ते तीन मुले जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. मुलीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.