कल्याण/प्रतिनिधी – चोरी करण्यासाठी चोरटे रोज नवनवीन युक्त्या लावतात. चैन स्नेचिंगच्या घटनांमुळे तर महिलांना आभूषण घालने देखील कठीन झाले आहे. अशातच डोंबिवलीतील 72 वर्षीय आजीच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून नेणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांना पकडण्यात आले.
डोंबिवली पूर्वेत कल्याण शीळ रस्त्यावर ‘निश्मीता’ टी स्टॉल आहे. गुलाबी पुजारी या ७२ वर्षीय आजी हे टी स्टॉल चालवतात. मंगळवारी दुपारी आजी आपल्या दुकानात ग्राहकांसाठी चहा तयार करीत असताना दोघे त्यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाने सांगितले की मला पाणी बॉटल हवी आहे. आजी ग्राहकाला पाणी बॉटल देण्यासाठी पाठीमागे फिरल्या असता याचा फायदा घेत ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने गुलाबी आजीच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावली. या चोरट्याचा दूसरा साथीदार स्कूटी घेऊन रस्त्यावर उभा होता. आरोपी तेथून पळ काढत असताना गुलाबी पुजारी यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. हे पाहून आजूबाजूचे लोक दुकानाकडे धावले. रस्त्यावरच उभे असलेल्या पोलिसांनी देखील दुकानाकडे धाव घेतली. लोकांनी चोरांचा पाठलाग केला. यादरम्यान आपल्या बचावासाठी पळत असताना चैन स्नेचिंग करणारा मुख्य आरोपी हा नाल्यात पडला आणि जखमी झाला. तर त्याच्या दूसऱ्या साथीदाराने स्कूटीवरून पळ काढला.
पोलिसांनी आरोपीला नाल्यातून बाहेर काढून त्याला बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपीचे नाव गणराज छपरवाल आहे. गणराज हा डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्ती नगर शेलारा नाका परिसरातील रहिवासी आहे. अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली. तसेच गणराज छपरवाल चा साथीदार भूषण जाधवचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.