नेशन न्यूज मराठी टिम.
धुळे/प्रतीनिधी- धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील पळासनेरजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर अनियंत्रित होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना कालच घडली असताना आज धुळे शहरालगत सुरत नागपूर महामार्गावर साक्री तालुक्यात क्रुझर व ट्रकचा देखील भीषण अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
साक्री तालुक्यात सुरत बायपास रस्त्यावर ट्रक व क्रूझरचा अपघात झाला. या अपघातात सोलर प्लेटने भरलेला ट्रक हा सुरतहून नागपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सुरत बायपास रस्त्यावर विरुद्ध बाजूने क्रुझर भरधाव वेगाने आल्याने ट्रक व क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातादरम्यान गुजरातकडून येणारा ट्रकने क्रुझरने जोरदार धडक दिल्यामुळे सोलर प्लेट घेऊन जाणाऱ्या ट्रकने तात्काळ पेट घेतला तर या अपघातात क्रुझर कारचा देखील चेंदामेंदा झाला आहे. यावेळी ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत गाडी मधून उडी घेत आपला जीव वाचवला आहे. दरम्यान क्रूझरमध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या या अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर येथे तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य झाल्याने या घडलेल्या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र महामार्गावरील अपघातांचे सत्र कायम असल्याचे या अपघातातून दिसून येत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नॅशनल हायवे प्रशासनाने काय उपाय योजना करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.