कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने येथे खळबळ उडाली असून निवडणूक शासकीय अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे या इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कल्याण मध्ये नायब तहसिलदार म्हणुन कार्यरत असणाऱ्या वर्षा राजेश थळकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील माधव संसार मधील फ्लॅट नंबर बी 2 या ठिकाणी ही ओळखपत्रे आढळून आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर 2020 रोजी नगरसेवकांचे राजवट संपुष्टात आली असून कोरोणामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टिकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्र बनवली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कामेश मोरे याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीने हुंड्याची केस दाखल केली होती. या गुन्ह्यात कामेश याला कोर्टाने घरी न जाण्याच्या आणि पत्नीला त्रास न देण्याच्या अटीवर जामीन दिला होता. यानंतर कामेश याने आपल्या मुलींना फोन करून घरात असलेले कार्ड घ्यायला येत असल्याचे सांगितले. हि बाब त्याच्या पत्नीला समजताच तिने याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना दिली. आकडे यांनी नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना सांगत कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार थळकर यांनी कारवाई करत या घरातून सुमारे ४०० ते ५०० बनावट कोरे मतदार ओळखपत्र जप्त करत कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली