नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे खरिप पिके होत्याची नव्हती झाली आहेत. याचसंदर्भात आज जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
त्यात मागणी केली आहे की लवकरात लवकर जालन्यात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर कराव्यात. तसेच अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही त्यात शेतकऱ्यांना ई केवायसी मुळे लाभ मिळाला नाही ते पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना विमा मिळणेबाबत संबंधित विमा कंपनीच्या अधिकारी यांना शासनाने सांगितल्यानुसार पत्रव्यवहार झाला परंतु त्यांना अद्याप पिकविमा मिळालेला नाही.
जालना जिल्हयामधील सर्व मंडळामध्ये यावर्षी ४० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला आहे. पिक विमा कधी मिळणार, अशी शेतकरी वारंवार विचारणा करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना अग्रीम पिकविमा मंजुर करण्यात यावा व जिल्ह्याभरात MREGS अंतर्गत कामे सुरु करुन मजूरांच्या हाताला काम देण्यात यावे, संपूर्ण जिल्ह्याभरात दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे, अशा अनेक मागण्या महाविकास आघाडीने या निवेदनामार्फत केल्या आहेत.
शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान बँका कर्जखात्यात जमा करीत असल्याने सदरील अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून अनुदान कर्जखात्यात जमा न करणेबाबत सर्व बँकाना आदेशित करावे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज वसुली तात्काळ थांबवून वीज खंडीत करण्यात येऊ नये.
जिल्हयातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे याबाबत शासनाने दक्षता घेऊन उपययोजना करावी, जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस माफ करावी. मोसंबी फळांची गळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. व शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुद्धा चाऱ्याची व्यवस्था शासनाने करावी यासह विविध मागण्या घेऊन आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार बदनापूर आदींची उपस्थिती होती.