नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरीच्या आशेने अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून परीक्षा देताना दिसतात. सर्वसामान्य आर्थिक परीस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे अवाजवी शुल्क वाढीमुळे आता शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणे अधिकच अवघड झाले आहे. स्पर्धा परीक्षांचे अवाजवी शुल्क माफ करावे, पसंतीक्रमाप्रमाणे परीक्षा केंद्र देण्यात यावे, पारदर्शकता व पेपर फुट टाळण्यासाठी सर्वच स्पर्धा परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला देण्यात यावे, ह्या विद्यार्थ्यांच्या ज्वलंत समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने करण्यात आली आहेत.
चालू वर्षात तीन ते चार आंदोलने करूनही शासन-प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आंदोलन एकदम टॉवरवर करण्याचा निर्णय घेतला होता. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन, सर्व यंत्रणा, पोलीस विभाग कमालीचे व्यस्त आहे. मात्र टॉवर आंदोलन करण्यापासून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले आहे. तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.