नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली/प्रतिनिधी – सांगलीच्या मांगरूळ येथील उत्तम मारुती मस्के यांच्या घरी लावलेल्या ब्रह्मकमळ या झाडाला चक्क फळ लागले आहे. हे फळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. आज पर्यंत ब्रह्मकमळाच्या झाडाला फक्त ब्रह्मकमळ उमलते एवढेच लोकांना माहीत होते. परंतु ब्रह्मकमळाच्या झाडाला लागलेलं फळ हे प्रथमच पहायला मिळाले असल्याने हा एक निसर्गाचाच चमत्कार असल्याचे लोक समजत आहेत.
शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावातील एक रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत असणारे उत्तम मस्के यांनी आपल्या घरी चार वर्षांपूर्वी ब्रह्म कमळाच्या झाडाचे पान लावले असता या झाडाला अनेक वेळा फुले आलेली पाहण्यात आली होती. परंतु मागील सात ते आठ दिवसात या झाडाला कसले तरी फळ लागले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते फळ हळूहळू मोठे होऊन गडद लाल रंगाचे झाले. आजपर्यंत या झाडाला ब्रह्मकमळ उमलते एवढेच माहीत असणाऱ्या मस्के यांनी अचानक उगवलेल्या फळाबाबत आश्चर्य व्यक्त केले,यांच्या बाबतीत हा दुर्मिळ योग होता. या पुर्वी ब्रह्मकमळाच्या झाडाला फळे लागल्याचे ऐकण्यात आले नव्हते. ब्रह्म कमळाच्या झाडाला फुले येण्याची सगळेच वाट पाहतात.मात्र ब्रह्मकमळाच्या झाडाला आलेले फळ म्हणजे दुग्धशंकराचा योगच म्हणावा लागेल. ब्रह्मकमळाला फुल येन जसं वेगळेपणच आहे, त्याहीपेक्षा या झाडाला फळ येणे हे दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.