नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वनविभागाच्या पथकाने त्यांची साक्ष नोंदवली आहे. शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघ दात सदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाघदंत सदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी दिली आहे.
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून, 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते. तो वीडियो सध्या व्हायरल देखील होत आहे. यासंदर्भाने प्रादेशिक वनविभागाने आमदार संजय गायकवाड यांची एक साक्ष घेतल्याची माहिती वनविभागाने दिली. आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले. तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामधे तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते अशी माहिती देखील अभिजीत ठाकरे यांनी दिली.