नेशन न्यूज मराठी टीम.
जालना/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला समविचारी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जालना जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र शिरसाट, मुस्लिम इदिहत फ्रंट चे जावेद कूरेशी प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चमन येथून हा मोर्चा काढण्यात आला. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी प्रास्ताविक करतांना महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लढा उभारला असून या लढ्यात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अशोक हिंगे पाटील सविताताई मुंढे, जितेंद्र शिरसाट, दीपक डोके यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना सत्ताधारी मंडळींचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करून जातीयवादी विचारसरणीचे सरकार उलथून टाकण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीत असल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद यांनी मागासवर्गीय व मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचारास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला
. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादी प्रवृतीला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करावे, असे आवाहन केले. या सभेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन त्यांच्या हस्ते मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील अत्याचार रोखण्याची तसेच अत्याचारग्रस्तांना आर्थिक मदत व अत्याचार प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले.
या जन आक्रोश मोर्चात महासचिव प्रशांत कसबे, बालाजी जगतकर, पुरुषोत्तम वीर,संतोष आढाव, खालेद चाऊस, राजेंद्र वांजोळे, परमेश्वर खरात राजेंद्र खरात, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रमाताई होर्शिळ,भानुदास साळवे,प्रकाश मगरे, प्रकाश बोर्डे, विजय लहाने, शेख लालाभाई , ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.