नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या तत्वांना जोपासणारी रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित ‘गोधडी’ हे मराठी नाटक सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे 26 नोव्हेंबर 2022, शनिवार, सकाळी 11.30 वाजता प्रस्तुत होणार आहे.
आपला भारत देश कसा असावा याचं प्रारूप स्पष्ट करणारे दृष्टीपत्र आहे, आपले भारतीय संविधान ! “आम्ही भारताचे लोक” हा संकल्प लोकशाहीत जनतेच्या सहभागाची ग्वाही आहे. या सार्वभौम भारताचे आपणच मालक आहोत, ही दृष्टी आपल्या संविधानात अंतर्निहित आहे. स्वातंत्र्य, समता, विविधता, सौहार्द तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय यांना एकत्रित करणारी “गोधडी” आहे, रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”
“गोधडी” भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक “गोधडी” .!
प्रेम,सदभाव,माणुसकीच्या कलात्मक धाग्यांनी विणलेली गोधडी प्रस्तुत करणारे कलाकारअश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर हे आहेत.