नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसला कल्याणात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र नागरिक आणि बसच्या ड्रायव्हर-कंडक्टरने वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
नवी मुंबई महापालिकेची एमएच ४३ एच ५२९८ या क्रमांकाची बस प्रवासी घेऊन कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने निघाली. कल्याणमध्ये ही बस कल्याण पूर्वेच्या नेतिवली परिसरातून जात असताना बसच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे नागरिक आणि ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी लगेचच ही ही बस थांबवली आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरने सतर्कता दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरवलं. तर आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दल येईपर्यंत बादल्यांच्या सहाय्याने पाणी मारण्यास सुरुवात केली. केडीएमसी अग्निशमन दलानेही त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळवले.
त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या आगीमध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.