नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – महाराष्ट्रात दरवर्षी सर्वत्र पावसाच्या जोरासकट दहीहंडीचा उत्साह देखील दिसून येतो. दहीहंडीच्या उंच थरांचा थरार आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सर्वच वयोगटातील प्रेक्षक नागरिक या गर्दीच्या ठिकाणी एकत्र येतो. मानाच्या समजल्या जाणाऱ्या हंड्याना सलामी देऊन बक्षीस घेण्यासाठी महिनाभर आधीपासून हे खेळाडू सराव करतात. ह्या खेळाला साहसी खेळांचा दर्जा द्यावा. तसेच ह्या साहसी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा अपघात विमा क्रीडा मंडळांनी अथवा आयोजकांनी काढावा ह्या चर्चा आपण ऐकतो. उंच थरावरून खेळाडू खाली कोसळून गंभीर दुखापत होवून त्यांना कायस्वरूपी अपंगत्व येते तर काहींना प्रसंगी आपला जीव गमवावा लागतो.
राहत्या वस्त्या, सोसायटीपासून बांधली जाणारी हि हंडी आता मोकाच्या ठिकाणी बांधून उंच थर उभे केले जातात. सकाळी सुरु होणारा खेळ जशी रात्र होवू लागते त्या अंधारात अधिक रंगू लागतो. ह्या दहीहंडीच्या आयोजनात राजकीय मंडळींचा सहभाग अलीकडे वाढलेला दिसतोय. यामुळे चौकात वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय हंडी पाहायला येणाऱ्या जमावाला सांभाळणे देखील अवघड होते. दहीहंडीच्या उत्साहात थर पाहण्यात गुंग असताना मनाला चटका लावून जाणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.
बुलढाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रम ऐन रंगात आला. थर चढवले गेले. थर चढवताना पावसाचा जोर देखील तितक्याच जोशात बरसत होता. आणि दहीहंडीचे हे चित्त थरारक क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी जमाव देखील सज्ज झाला. इतक्यात देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा भागात ही दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीसाठी भिंतीला दोरखंड बांधला असता हंडी फोडताना थर कोसळल्याने ,काही तरुण स्वतःचा तोल वाचवण्यासाठी ,दोरखंडाला लटकले. त्यात पावसाने ओलीचिंब झालेली भिंत कोसळली आणि त्या खाली 8 वर्षीय निदा रशीद खान पठाण नामक मुलगी दगावली आहे. तर एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले आहे.
हंडीच्या साहसी खेळात सहभागी सदस्यांचा अपघात विमा आयोजकांनी काढला असला तरी हंडी पाहण्यासाठी जो लोकांचा जमाव तिथे जमतो त्यांच्या सोबत अश्या जीवघेण्या घटना घडल्यास ह्याची जबाबदारी ह्या राजकीय दहीहंडीतील आयोजक मंडळीनी घ्यावी कि सरकारने ? मानाची दहीहंडीला सलामी देणाऱ्या संघ सदस्यांच्या अपघात विम्यासोबत, हंडी पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या जीवाचा विमा कुणी काढावा असा प्रश्न उभा राहिला आहे.