ठाणे/प्रतिनिधी -ठाणे सामान्य रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय देवदूत ठरत असून, अत्यंत जटील आणि खिशाला न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया कुशलतेने केल्या जात असल्याचा प्रत्यय सोमवारी दिसून आला. एका महिलेच्या पोटातील तब्बल दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे.
उल्हासनगर परिसरात भाजीविक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होतं. परिस्थिती सामान्य असल्यामुळे खाजगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी, असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता. त्यामुळे या दुखण्याकडे दुर्लक्ष केले गेले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल. त्यानंतर २० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं गेलं. यावेळी रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील सुमारे दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा बाहेर काढला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन काढल्यानंतर तिच्या पोटात पाण्याने भरलेला मासाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती. परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
महिलांच्या पोटातील मासाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखं दुखणं, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काहीवेळा हा गोळा कर्करोगाचा ही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवला आहे.