सोलापूर/अशोक कांबळे – खर्च जास्त आणि उत्पादन कमी म्हणून शेती परवडत नसल्याचे सांगत अनेकांनी शेती व्यवसाय सोडत शहराची वाट धरली.त्यातच शेती मालाला हमी भाव नसल्याने अनेक शेतकरी निराशेच्या गर्तेत गेले आहेत.शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत असताना पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत थिटे दाम्पत्याने सव्वा एकरात उन्हाळी कांद्याचे २५ टन उत्पादन घेतले आहे.शेती क्षेत्र अडचणीत असतानाही योग्य नियोजन करत भरघोष उत्पादन घेता येते हे या दाम्पत्याने दाखवून दिले आहे.सध्या बाजारात कांद्याला भाव कमी असल्याने आधुनिक कांदा चाळ उभी करत त्यात कांदा साठवला आहे.कांद्याला बाजारात योग्य भाव आल्यानंतरच कांदा विकणार आहे असे या कांदा उत्पादक शेतकरी दाम्पत्याने सांगितले.
डॉ. नित्यानंद थिटे व प्रा.स्वाती थिटे अशी या दाम्पत्याची नावे असून उच्च विद्याविभूषित आहेत.दाम्पत्य अनगर ता.मोहोळ,जि.सोलापूर येथील आहे.या दाम्पत्याकडे वडिलोपार्जित जमीन असून यात त्यांनी सीताफळ,शेवगा,आंबा,ऊस,कोथिंबीर, कांदा याची लागवड केली आहे.याचबरोबर थिटे यांच्याकडे १०० प्रकारची देशी बियाणे असून यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला,पालेभाज्या,फळभाज्या यांचा समावेश आहे.
कांदा लागवडीपूर्वी थिटे यांनी जमिनीची चांगली मशागत करून घेतली.मशागतीनंतर ५ ट्रॉली शेणखत शेतात पसरवून टाकले.शेतीला पाणी देण्यासाठी त्यांनी रेन पाईप सिंचन पद्धतीचा वापर केला.या रेन सिंचनच्या माध्यमातून सव्वा एकर क्षेत्र भिजवून घेतले.जमीन कांदा पेरण्या योग्य झाल्यानंतर पुणे फुरसुंगी कांदा बियाणांची ३ किलो पेरणी केली.कांदा पेरणीच्या ३ आठवड्यानंतर तणनाशक विप सुपर व कांदा मोठा होण्यासाठी गोलची फवारणी केली.फवारणी नंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने कांद्याची खुरपणी करून घेतली.खुरपणी नंतर कांद्याला पाण्याचा थोडा ताण दिला.केरेन सेंद्रिय तंत्रज्ञान,मिश्र खते,सूक्ष्म अन्न द्रव्य खते कांद्याला दिली.तसेच कांद्यावर एक वेळेसच बुरशीनाशक व कीडनाशकांची फवारणी करून घेतली.कांद्याला रेन पाईप सिंचन पद्धतीचा वापर करत फक्त रात्रीच्या वेळेसच पाणी दिले.रात्रीच्या पाण्याचा फायदा असा झाला की,कांद्यावरची रोगराई कमी झाली.रेन पाईपमुळे कांद्याला गरजे इतकेच पाणी मिळाले.केरेन सेंद्रिय तंत्रज्ञानाचा योग्य वेळी योग्य वापर केल्याने कांदा पिकाची निकोप व दर्जेदार वाढ झाली.रेन पाईपने पावसाप्रमाणे पाणी दिल्याने कांदा तिखट न होता त्याला आकर्षक गुलाबी गोलाई आली.त्यामुळे कांद्याचे विक्रमी पीक निघाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा पेरणीच्या तीन ते चार महिन्यानंतर कांदा काढणी झाली.त्यावेळी कांद्याला बाजारात योग्य भाव नव्हता.त्यामुळे भाव येईपर्यंत कांदा टिकून ठेवणे अवघड काम होते.त्यासाठी थिटे दाम्पत्याने पारंपारिक व तंत्रज्ञानाचा मेळ घालत कांदा टिकून राहील अशी आधुनिक कांदा चाळ उभी करून कांदा साठवला आहे.गेल्या काही महिन्यापासून कांदा चाळीत असून कांदा टिकावा म्हणून पंधरा दिवसातून एकदा कांद्यावर सल्फर पावडर व बुरशीनाशक औषधांचा मारा केला जात आहे.सध्या बाजारात कांद्याला भाव कमी असल्याने कांद्याला बाजारात योग्य भाव आल्यानंतरच कांदा विकणार आहे असे या कांदा उत्पादक शेतकरी दाम्पत्याचे म्हणणे आहे.कांद्याला योग्य भाव आल्यानंतर ८ ते १० लाखाचा कांदा होईल असा विश्वास डॉ. नित्यानंद थिटे व त्यांचा पत्नी प्रा.स्वाती थिटे यांना आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी शेतकऱ्यांनी शेती पूरक जोडधंदे उभारावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.त्याचे कारण विषद करताना त्यांनी सांगितले की,उदा.चाळीत साठवलेल्या कांद्याला भाव येईपर्यंत काही महिन्याचा कालावधी जाऊ शकतो.घरचे आर्थिक नियोजन बिघडू नये. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत भाजीपाला,दुग्धव्यवसाय, कुकुटपालन,शेळीपालन तसेच शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आवश्यक आहे.
कांदा उत्पादक शेतकरी डॉ. नित्यानंद थिटे यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितले की कांदा पिकाला हवामान खराब होते.रात्रीचा वेळी कांद्याला रेन पाईपने पाणी दिल्याने रोगराई कमी होऊन कांदा एकदम चांगला वाढला.कांदा पिकासाठी १० टक्के रासायनिक खतांचा तर ९० टक्के सेंद्रिय खतांचा वापर केला आहे.यामुळे ४ महिन्यानंतर ५० गुंठ्यांत विक्रमी असे २५ टन कांद्याचे उत्पादन निघाले आहे.कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत साठवला आहे. पावसाळ्याच्या दिवसात कांद्याच्या दरात तेजी असते.त्यावेळेस कांदा बाजारात विकणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने उत्पादनाला बाजारात भाव नसेल तर साठवणुकीचा पर्याय अवलंबल्यास कोणतेही पीक वाया जात नाही.कांद्याचे पीक तर अजिबात वाया जात नाही.
व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या पण शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रा.स्वाती थिटे यांनी सांगितले की,विकासाचा शाश्वत मार्ग म्हणून मी शेतीकडे पाहते.शेतीमध्ये आधुनिक व नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आवश्यक आहे.थोडे सूक्ष्म निरीक्षण, नियोजन केले तर आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन घेता येते.मार्केटचा अभ्यास करून आपल्याला जर ते उत्पादन विकता नाही आले तर साठवणूक करून मार्केटमध्ये चांगला भाव आल्यानंतर उत्पादन विकून आपला आर्थिक विकास साधू शकतो.साठवणुकीची पध्दत नवीन नाही जुनीच आहे. शेतीच्या बाबतीत सूक्ष्म निरीक्षण करून चांगल्या प्रकारची शेती तरुण मुले करू शकतात.शेतीकडे करिअरचे क्षेत्र म्हणून पाहता येऊ शकते.शेती,निसर्ग आपल्याला अशाश्वत वाटत असेल थोड्याशा संयमाने चिकाटीने शेती केली तर आपण आपला स्वतःचा विकास करू शकतो.नोकरी केली तर एक व्यक्ती पुढे जाते.शेती चांगल्या पद्धतीने केली तर आख्खे कुटुंब पुढे जाते.त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळावे.