महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख आर्थिक मदत

मुंबई/प्रतिनिधी – कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी  पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्युमुखी  पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीने ७४ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा मंगळवारी, १ जून २०२१ रोजी ७३ वा वर्धापनदिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाही एसटीचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मंत्री, ॲड. अनिल परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलताना  मंत्री, अ‍ॅड. परब यांनी कामगारवर्गाला मोठा दिलासा देत आश्वस्त केले.

ॲड. परब म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत मंत्री, ॲड. परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ३० जून २०२१ पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहिर केले.

कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अ‍ॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. सद्या एसटी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे सांगतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी पुन: एकदा उभारी घेईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतूकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्‍यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी सुमारे चार हजार चालक व वाहक रस्त्यावर उतरले होते. या सेवेच्या माध्यमातून महामंडळाला प्रतिदिन १ कोटी रूपयांचा महसूल मिळत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्‍यांच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून एसटी बसेस काढून घेण्यात आल्याचे मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केले. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा मंत्री, अ‍ॅड, परब यांनी केली. त्यामुळे या चालकांची ओढाताण होणार नाही, याची काळजी महामंडळ आजपासून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×