कल्याण/ प्रतिनिधी – गौरीपाडा येथे विकसित होणा-या टाऊनपार्कच्या कामामध्ये बाधित होणा-या जमिनधारकांना नियमांनुसार मोबादला देण्यासाठी कार्यवाही सुरू करावी असे आदेश पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी नगररचना विभागाला दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजुर विकास योजनेतील मौजे गौरीपाडा येथील आरक्षण क्रं, १७४ टाऊनपार्क विकसित करण्यासाठी कल्याण डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टप्पा क्र.१ चे काम हाती घेण्यात आलेले आहे. या कामाचा कार्यादेश दि. १९.५.२०१८ रोजी दिलेला आहे. या कामाची मुदत २४ महिन्यांची होती तथापि सदर आरक्षित जमिनीपैकी सुमारे २० टक्के जमिन खाजगी मिळकत धारकांकडून अदयापही संपादित केलेली नसल्यामुळे कामाची गती मंदावलेली आहे.
संबंधित ठेकेदारांमार्फत विविध कामे सुरु झाली असून उचित फॉर्मेशन लेवलसाठी भरणीही करण्यात आली आहे. तथापि सदर मिळकतधारकांनीही रितसर हस्तांतरणीय विकास हक्क मिळे पर्यंत काम सुरु करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे नदीलगतचे रिटेनिंग वॉल व गॅबियन वॉलचे काम झालेले नाही. हे काम पावसाळयापूर्वी करणे आवश्यक आहे. यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्तरावरून जमिन धारकांना उचित सुनावणी देण्यात येवुन भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली आणि सुनावणी दिली.
या जमिनधारकांनी आयुक्तांच्या आदेशाला सहमती देवून काम करू देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे काल पासून रिटेंनिंग वॉलचे काम पुन्हा सुरू झाले असून जमिनधारकांना नियमांनुसार मोबादला देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी नगररचना विभागास दिले आहेत