कल्याण/प्रतिनिधी – मोकळया जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या हॉस्पिटलकडून १० हजारांचा दंड वसूल करत केडीएमसीने कारवाई केली आहे.मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकला गेल्यास त्यापासून नागरिकांना अपाय होऊ शकतो. याकरीता सदर मेडिकल वेस्ट संबंधित हॉस्पिटल, क्लिनीक यांचेकडून संकलित करुन त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने उंबर्डे येथील बायोमेडिकल प्रकल्पावर विघटन करण्याकरीता आरोग्य विभागाने एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. या एजन्सीकडे आपल्या दवाखान्यातील, क्लिनिकमधील मेडिकल वेस्ट सुपुर्द करणे अपेक्षित आहे. असे असतांनाही डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभागातील श्री सदगरु कृपा हॉस्पिटल मधुन घन:श्याम गुप्ते रोड, बदाम गल्ली येथे मोकळया जागेत मोठया प्रमाणात मेडिकल वेस्टचा कचरा टाकला जात असल्याची तक्रार व्टिटर वरुन प्राप्त होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे सुचनेनुसार ह प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते तसेच ह प्रभागातील प्रभारी आरोग्य निरिक्षक लांडगे यांनी सदर ठिकाणी समक्ष पाहणी केली.
सदर रुग्णालय सार्वजनिक ठिकाणी मेडिकल वेस्ट टाकत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येताच सदर रुग्णालयास दंड भरण्यास सांगितले, तथापी सदर रुग्णालयाने दंड भरण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगताच श्री सदगुरु कृपा हॉस्पिटलने १० हजार दंड महापालिकेकडे जमा केला आहे.