सोलापूर/प्रतिनिधी – सांडपाण्याच्या नावाखाली पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनीचे ५ टीएमसी पाणी पळवून नेले आहे.याबद्दल जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला नाही, ही सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे उजनीचे पाणी वाचवण्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा उभारावा लागेल असे मत स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक तथा शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी मांडले.
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पळविल्याच्या निषेधार्थ स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टे बंधारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी वनकळसे बोलत होते. पुढे बोलताना वनकळसे म्हणाले की, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र एकही कारखानदार या मुद्द्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. केवळ जनतेच्या बरोबर आहोत असे सांगून स्वतःच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाहीत. त्यामुळेच आपल्या सर्वांना उजनीचे पाणी वाचवण्यासाठी परिणामांची पर्वा न करता संघर्षासाठी तयार रहावे लागणार आहे.
याबाबत आपली भूमिका मांडताना वनकळसे म्हणाले की विधायक व न्याय या गोष्टीसाठी संघर्ष करून प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करण्यासाठी सोलापूरकर मागे हटत नाहीत. हा या जिल्ह्याचा जाज्वल्य इतिहास आहे. सध्या जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली उजनी सततच्या अतिक्रमणामुळे आज संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय विधिमंडळ नेते केवळ सोलापूरकरांच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र विधिमंडळात या मुद्द्यावर आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच उजनीतील पाणी वाचवण्यासाठी जातिभेदाच्या आणि पक्षाच्या चौकटी मोडून स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्राण पणाला लावून लढा देऊ.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीचे अशोक भोसले, श्रीरंग लाळे, महेश पवार,बाळासाहेब वाघमोडे,दादासाहेब पवार,सिद्धराम म्हमाणे, समन्वयक विकास वाघमारे यांची भाषणे झाली.यावेळी जेष्ठ शेतकरी नेते शिवाजीराव चव्हाण,सौदागर साठे,केशव वाघचवरे, नानासाहेब सावंत, हर्षल देशमुख,अमर चव्हाण, गणेश लखदिवे,जनार्धन ताकमोगे, बालाजी ताकमोगे, सागर काळे, फंटू कोळेकर, विशाल काळे, तात्या निकम,महेश गावडे,संतोष वाघचवरे, योगेश गोवर्धनकर, दादा हंडोरे, औदुंबर आरेकर यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.
- May 2, 2021