कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता बऱ्याच वेळेला भासते आणि ऑक्सिजन अभावी रुग्ण गंभीर अवस्थेत जातो, हे टाळण्यासाठी, कोविड रुग्णांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने आता पीएसए टेक्नोलॉजी वर आधारित २ ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठीचे कार्यादेश नुकतेच २ कंपन्यांना दिले आहेत. खाजगी कोविड रुग्णालयांनीही असे ऑक्सिजन प्लांट उभारावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
या कंपन्यांची यंत्रणा हवेतील ऑक्सिजन शोषून महापालिकेसाठी सदर ऑक्सिजन प्लांट द्वारे पुरवणार आहे. २४ तासात १७५ ते २०० जंबो सिलेंडर भरतील इतका ऑक्सिजन सदर प्लांट मार्फत निर्माण होईल. सदर प्लांट कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २० ते ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्लांटमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन महापालिका नव्याने उभारत असलेल्या कोविड हॉस्पिटल मध्ये वापरला जाईल. या ऑक्सीजन प्लांट उभारणी मुळे क्रिटिकल अवस्थेतील कोविड रुग्णांना बराच दिलासा मिळणार आहे.