महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

डोंबिवलीत आयडीबीआय बँकेतील अकाऊंट वर सायबर हल्ला,तीस ग्राहकांचे पैसे लंपास

डोंबिवली/प्रतिनिधी- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. गेल्या वर्षातही अनेक महिने राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच ऐन लॉकडाऊनमध्ये डोंबिवलीकर बँक खातेदारांवर सायबर हल्ला झाला आहे. आयडीबीआय बँकेच्या डोंबिवली शाखेतील काही खातेदारांचे अकाऊंट रिकामे झाल्याने खळबळ माजली आहे.
      आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आजही लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत डोंबिलीतून धक्कादायक घटना बाहेर आली आहे. आयडीबीआय बँके डोंबिवली शाखेतून तब्बल 30 ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बँक प्रशासन मात्र काही बोलण्यास तयार नाही. मात्र पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला असून तपासही सुरु केला आहे.
     

डोंबिवली पूर्वेकडे फडके रोडला बाजीप्रभू चौकात आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेत असलेल्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गहाळ झाल्याची बातमी कळताच गुरुवारी सकाळपासून बँकेत गर्दी झाली. या बँकेतील अनेक खातेदारांचे पैसे ऑनलाईनद्वारे परस्पर काढण्यात आले. राज्यात आधीच लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे भयानक परिस्थिती आहे. कोरोनाची लागण झाली तर औषधांसाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे जवळ असणे महत्वाचे आहे. मात्र बँकेतील अकाऊंटमध्ये असलेले पैसे असे अचानक कुणीतरी ऑनलाईन पद्धतीने काढून नेल्याने या खातेदारांची पाचावर धारण बसली आहे. खात्यातून पैसे वजा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मात्र खातेदारांनी बँकेकडे धाव घेऊन तेथील प्रशासनाला विचारणा केली. मात्र उत्तरे नीट मिळत नसल्याने ज्या खातेदारांच्या खात्यातून ऑनलाईन अचानक पैसे कापले गेले त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. खातेदारांनी पोलिसांना सांगितले की, कमीत कमी 50 खातेदारांच्या खात्यातून पैसे गहाळ झाले आहेत. मात्र पैसे गहाळ झाल्यानंतर बँकेकडून जी प्रक्रिया करण्यास सांगितली गेली, ती सुद्धा ग्राहकांना त्रासदायक होती. एकीकडे पैसे गेले. दुसरीकडे प्रक्रियेत तासंतास गेल्याने खातेदार हैराण झाले. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे, अशी खातेदारांची मागणी आहे.
   

 या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास इन्कार केला. या प्रकाराविषयी डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी सांगितले की, या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांची तक्रार प्राप्त झाली आहे. बँकेच्या बाजूला एटीएम मशीन आहे. या मशीनमधूनच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जास्त ग्राहकांनी या मशीनचा वापर केला आहे. आरोपींनी एटीएममध्ये स्क्रिनिंग-स्कॅनिंग केले असावे. त्याआधारे ऑनलाईनद्वारे पैसे काढले गेले असावेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला जात आहे, असेही एसीपी जय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, अशी मागणी फसगत झालेल्या खातेधारकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×