भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास महसूल वसुली साठी जोरदार मोहीम राबवून महसूल गोळा केला जात असताना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भिवंडी तालुक्यासाठी २०२० – २१ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलाचे ९५ कोटी रुपये ,तर गौणखनिजा उत्पन्न १५ कोटी ५० लाख वसुलीचा इष्टांक देण्यात आलेला आहे.
या वसुली साठी दिलेल्या इष्टांक वसुलीची कार्यवाही ३१ मार्च २०२१ अखेर पूर्ण करण्यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संपूर्ण तालुक्यात शासकीय वसुलीची धडक कार्यवाही सुरु केली आहे. या कारवाही अंतर्गत तालुक्यातील ज्या खातेदारांना मागील वर्षा पर्यंत शासनास देय असलेल्या रक्कमा अदा केलेल्या नाहीत, अशा खातेदारांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करुन सील करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मौजे कारीवली, काल्हेर, खोणी, पूर्णा, सोनाळे, कोन, अंजूर, वडपे इ. ठिकाणी कारवाई करुन १९५ गोडाऊन गाळे, १ कंपनी आणि एक सॉ मील इत्यादी मालमत्ता सील करुन आपला इष्टांक पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महसूल वसुली साठी थेट गोदाम जप्ती ची कारवाई सुरू केल्याने गोदाम मालकांमध्ये खळबळ माजली आहे .
गोदाम मालकांसह ज्या नागरिकांचे शासकीय शुल्क भरणे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ते जमा करावे अन्यथा कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांत अधिकरी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे.