छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – रात्रीच्या वेळेस अनेक लहान मोठी,अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. पण रात्रीच्या शांततेचा फायदा घेऊन लुटपाट करणाऱ्या अनेक टोळ्या महाराष्ट्रभर सक्रिय आहेत. संभाजीनगर मधील वाळूज परिसरात रात्रीच्या सुमारास खताची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला अडवून त्याच्यासोबत मारहाण करणाऱ्या तसेच त्याला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
वाळूज परिसरात रात्रीच्या सुमारास खताची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला कार मधून आलेल्या काही लोकांनी अडवले. एवढेच नाही तर पाच ते सहा जणांच्या टोळीने ट्रक चालकावर हल्ला केला. ट्रक आपल्या ताब्यात घेत या टोळीने तेथून पळ काढला. पण थोड्या अंतरावरच ट्रक बंद पडला. आरोपी बिघडलेल्या ट्रकला रस्त्यावरच सोडून तेथून पळून गेले. ट्रक चालकाच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात ट्रक लुटणाऱ्या पाच आरोपींसह एका विधी संघर्ष बालकास वाळुज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ट्रक, खतांच्या गोण्या आणि आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण १५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला. अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे.