ठाणे/प्रतिनिधी - पावसाळा सुरू झाला की मुंबईसह आसपासच्या शहरातही पाणी साचते.नाल्यात साचलेला तुडुंब कचरा आणि अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार पसरतात.ज्यामुळे स्थानीय रहिवाशांना वारंवार याची किंमत मोजावी लागली आहे.यावेळीही बहुतेक अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे.कारण पावसाळा जवळ आला असतानाही ठाणे (Thane) मनपाला दिव्यातील नाले सफाईला अजून मुहूर्त मिळाला नाही.नाल्यात तुडुंब कचरा साचलेला आहे.मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली.यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच दिव्यातील नाले सफाई संदर्भात लवकरच ठाणे मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ठाणे मनपा हद्दीतील दिव्यात प्रचंड गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच आहेत. मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे मनपा दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे. दिव्यात कोणत्याही प्रकारचा नाले सफाईच काम सुरू झालं नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.
आमदार राजू पाटील (Raju patil) यांनी दिवा शिळं रोड, साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिव्यातील न झालेल्या नाले सफाईमुळे पावसाळ्यात दिवा तुंबण्याची भीती अधिक असल्याने लवकरच आयुक्तांची भेट घेऊन दिवेकरांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.