नांदेड/प्रतिनिधी – अवैध सावकारीमुळे नांदेडमधील हसतं खेळतं घर उध्वस्त झालं आहे. व्याजाच्या पैश्यासाठी तगादा लावला जात असल्याने एका व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी माजी नगरसेविकेच्या मुलासह तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी अॅक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य आरोपी तथा माजी नगरसेविकेचा मुलगा दिपक सुभाष पाटील मात्र, फरार असल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी दिपक पाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात.
समीर येवतीकर यांचा आवळा कँडी विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी येवतीकर यांनी चिठ्ठी लिहली होती. त्या चिठ्ठीमध्ये दिपक पाटील हा पैशांसाठी तगादा लावत होता, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. समीर येवतीकर यांनी तीन वर्षा पूर्वी आरोपी दिपक पाटील याच्याकडून एक लाख रुपये दोन वेळेस व्याजाने घेतले होते. व्याजाचे पैसे थकल्याने समीर यांना आरोपीकडून धमकी दिली जात होती. पैशांसाठी आरोपीनी १९ एप्रिल रोजी राहत्या घरून समीर येवतीकरला जबरदस्ती नेले. पैसे न दिल्यास महिलेच्या माध्यमातून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. व्याजाचे पैसे थकवल्याने आरोपी हे समीर येवतीकर यांच्याकडून दररोज एक हजार रुपये दंड घेत होते. याच सर्व त्रासाला कंटाळून येवतीकर यांनी आपले जीवन संपवले आहे. याच धमकीला आणि त्रासाला कंटाळून समीर येवतीकर यांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. समीर यांना सात वर्षाचा एक मुलगा आहे. आई-वडील वृद्ध आहेत. त्यांना देखील समीर हा एकुलता एक मुलगा होता.
या प्रकरणी मयताचे वडील सुधाकर येवतीकर यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी आरोपी दिपक पाटील, संदीप ढगे आणि दयानंद विभुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेत राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.