नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – अवैध शस्त्रांवर निर्बंध असताना देखील त्यांची खरेदी तसेच विक्री केली जाते. अनेक लहान-मोठ्या टोळ्या अतिशय सराईतपणे यात कार्यरत असतात. अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून पाच पिस्तुले आणि 11 काडतूस खरेदी करुन निघालेल्या जालना जिल्ह्यातील दोन संशयितांना सांगवी पोलिसांनी 11 मे रोजी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की, मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तुले घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. काही वेळाने दुचाकी एमएच 20, एफइ 5363 वर येणार्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढवून शिरपूरच्या दिशेने पलायन केले. खामखेडा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेतात शिरले. पोलिसांनी शेतात शोध घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांची झडती घेतली असता दीड लाख रुपये किमतीचे पाच गावठी कट्टे, 22 हजार रुपये किमतीची 9 एमएमची 11 जिवंत काडतुसे आणि 1 लाख 30 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयितांमध्ये बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (वय 28, रा.जानेफळ) व परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ (वय 26, रा.देवळीगव्हाण) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्निल बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.