नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नंदुरबार /प्रतिनिधी – शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण त्याच पोशिंदयावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. सद्या राज्यात पडणारा अवकाळी पाऊस, बदलते हवामान या सर्वांचा विपरीत परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाने तर शेतकऱ्याला साथ दिली नाही आणि त्याने काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य भाव सुद्धा मिळत नाही.
नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात झाली आहे. यावेळी अवकाळी पाऊस व पाण्याची कमतरता यामुळे गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच उशिरा निघालेल्या गव्हाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी कमी पावसामुळे गहू लागवडीला उशिरा सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात होत असलेली लागवड या वर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आली आणि यावर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू पिकाचे नुकसान झाले व गव्हाचे क्षेत्र कमालिने घटले त्यामुळे फेब्रुवारीच्या महिन्यात निघणार गहू मार्च महिन्यात निघाला.
आधीच उशिरा निघालेला गहू आणि बाजार समितीत भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजार समितीत गहू येत नसल्यामुळे यावर्षी मार्केट उशिराने सुरू झाले. परंतु आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे अतोनात नुकसान झाले व त्यातच बाजार समिती देखील गव्हाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लावण्यात आलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली आहे.