नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कालही काही असेच झाले दरवर्षी प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा थाटामाटात पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंना ऐकण्यासाठी लाखो मनसैनिक जमले होते. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. त्या नंतर राज ठाकरेंवर आता विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राज ठाकरेंवर कड्या शब्दात टीका केली ते म्हणाले “शिवसेनेतून फारकत घेतल्यापासून राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला. गेल्या काही वर्षांमधली मनसेची महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर ती चांगली नाही. मनसेची भूमिका नेहमी बदलत चाललेली आहे. त्यांचे 13 आमदार होते दुर्दैवाने आज त्यांच्याकडे फक्त एकच आमदार शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची लोकप्रियता घटत चाललेली आहे. अशा परिस्थितीत बीजेपीला पाठींबा देऊन मनसेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. येत्या काळात महायुती यशस्वी होणार नाही याचा मला विश्वास आहे.”
त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा राज ठाकरेंवर ट्विट च्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्यामुळे आता विरोधी पक्षाबरोबरच राजठाकरेंवर विश्वास ठेवणाऱ्या लाखों मनसैनिकांना हाच प्रश्न पडला आहे की आता पुढे राज ठाकरे कोणती खेळी खेळतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीजेपीला पाठींबा दिल्यामुळे अनेक लोकांच्या नाराजीला राज ठाकरेंना सामोरे जावे लागणार आहे.