नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
भिवंडी/प्रतिनिधी – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित असणारी भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 15 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विकास दाखवत सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतर्फे काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये महाराष्टातील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याने त्याबाबत मोठी उत्सुकता लागून होती. मात्र आज हा महाराष्ट्रातील उमेदवारांचा सस्पेन्स आता संपला आहे.
या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभेसह नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, जालना, दिंडोरी,मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, पुणे आणि भिवंडी लोकसभा मदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून ते याही निवडणुकीत विजय मिळवून आपल्या विजयाची हॅकट्रिक साधतील का याचे उत्तर लवकरच मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भिवंडीकरांनी संधी द्यावी – कपिल मोरेश्वर पाटील
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवला. पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी, असे नम्र आवाहन केंद्रीय राज्यमंत्री व भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी केले आहे.
भाजपाच्या दुसऱ्या यादीत भिवंडीमधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबद्दल श्री. पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे अपलयाल तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.