नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
सध्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांसाठी हा सर्वोच्च धक्का मानला जातो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड करुन शिंदे फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. तेवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान झाल्याने धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत आज शरद पवार गटाचे पदाधिकारी धुळ्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या बॅनरवर नरेंद्र मोदी,अमित शहा,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो होते. बॅनर वरती फोटोला जोडे मारत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी हे बॅनर जप्त करत हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला.