नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नविन पिढी ही आपला धर्म, संस्कृती आणि ही चळवळ अशीच पुढे घेऊन जाणार आहे. देशात प्रभू श्रीराम मंदिर उभे राहील याचा विचार आपल्यापैकी कोणीच केला नव्हता मात्र ते राम मंदिर आज उभे राहत आहे. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले.
कल्याण येथील श्रीमलंगडाच्या पायथ्याशी मागील आठवडाभरापासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह – श्री मलंगगड हरिनाम महोत्सव सुरु होता. अगदी दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन महोत्सवाचा मंगळवारी समारोप झाला. या समारोपाच्या भाषणावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत कोकण प्रांतातील या सर्वात मोठ्या श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाला मागील आठवड्यात प्रारंभ झाला होता. मागील आठ दिवस केवळ आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाची मंडळी दररोज हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती. या अखंड हरिनाम सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांनी रचलेल्या पायावर कळस चढवण्याचे काम अखेरच्या दिवशी महंत ह.भ. प. भास्कर गिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून केले. तसेच यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी प्रतीकात्मक दहीहंडी फोडत त्याचा प्रसाद ग्रहण केला. या सप्ताह सोहळ्याच्या समारोपाला शंकराचार्य महाराज, मलंग गडासाठी जीवन वाहिलेले दिनेश देशमुख, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना राज्य समन्व्यक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा या महाराष्ट्रात दोन वेळा काढण्यात आला. सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर प्रतापगडावरील अतिक्रमणे सरकारने काढली तेव्हा दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यात आला. हे धर्माचे काम असून धर्माला पुढे घेऊन जाण्याचे काम आमच्या हातून होतेय अशी भावना सोहळ्याचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या समारोपावेळी व्यक्त केली. तर आपल्या माध्यमातून येणारी नविन पिढी ही आपला धर्म, संस्कृती आणि ही चळवळ अशीच पुढे घेऊन जाणार आहे. देशात प्रभू श्रीराम मंदिर उभे राहील याचा विचार आपल्यापैकी कोणीच केला नव्हता. ते राम मंदिर आज उभे राहत असून येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंग गडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकण प्रांतातील या सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि त्याच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्या प्रल्हाद शास्त्री महाराज आणि विश्वनाथ महाराज वारिंगे या दोघांचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शास्त्री महाराज यांना मलंग महर्षी तर विश्वनाथ महाराज यांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस नाना यांना श्री मलंगगड हरीनाम सप्ताह सोहळा आयोजकांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पहिल्यादांच आयोजित केलेल्या सोहळ्याला वारकरी संप्रदायाकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षीही याच तिथीला हा सोहळा आयोजित करणार असल्याची घोषणा यावेळी शास्त्री महाराजांकडून करण्यात आली.