नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
संभाजी नगर/प्रतिनिधी – भगतसिंह जनअधिकार यात्रा बंगळूर येथून सुरू होऊन देशातील 13 राज्यांमध्ये आणि 80हून अधिक जिल्ह्यातून आठ हजार पाचशे किलोमीटरचे अंतर पार करीत तीन मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर जाणार आहे. देशात वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, धर्मवाद आणि कष्टकरी जनतेच्या लुटीविरोधात झुंजार जन–एकजुटीसाठी काढली जात आहे.
2014 पासून विद्यमान सरकारने भांडवलदारांची खुलेआम सेवा करून सर्वसामान्यांची लूट करण्याचे सर्व रेकॉर्ड पार केले आहेत. मोदी सरकार म्हणाले होते की, देशांमधील बेरोजगारी दूर करू, रोजगार देऊ, भ्रष्टाचार मुक्त भारत करू पण तसं काही न घडता पुन्हा भ्रष्टाचार जास्त बळावला आहे.
नऊ वर्षांपूर्वी जो गॅस साडेचारशे रुपयाला मिळत होता आज तो गॅस हजार रुपयांच्या वर गेला आहे. 2017 पूर्वीच्या करांमधून मिळणारा एकूण सरकारी महसूलाच्या 32 टक्के रक्कम श्रीमंतांकडून गोळा केल्या जाणाऱ्या कार्पोरेट करातून येत होती. 2023 पर्यंत ती चोवीस टक्के झाली आहे. महागाई रेकॉर्ड मोडत आहे. हे सत्य समजून घेणे आज गरजेचे आहे. याच्या जनजागृतीसाठीच ही यात्रा देशाच्या विविध भागातून जात आहे. यात्रेत जनसंघटनांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक सामील होत आहेत. सर्व न्यायप्रिय नागरिक, कामगार-कष्टकरी, विद्यार्थी-युवकांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.