नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – दबाव तंत्राने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद करावे यासाठी धुळे जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन बेमुदत संपाची हाक दिली आहे. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आज धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला.क्युमाइन क्लब येथे जोरदार निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यातील सर्वच आशा सेविका,गट प्रवर्तक संपावर गेले आहे.
जोपर्यंत ऑनलाईनचे काम काढून घेतले जात नाही.तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्र घेण्यात आला आहे.
आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन द्यावे,गटप्रवर्तकांना ८४५० रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता द्यावा. ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे,दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी,भाऊबीज द्यावी यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
आशा वर्कर या कमी शिकलेल्या असून, त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजीमध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड आहे. अनेक आशांकडे स्मार्ट फोन देखील नसल्याने या कामासाठी त्यांना अडचणी येत आहे. या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना दिला जात नाही. आशा वर्कर यांना हे काम करण्यासाठी दडपण आणले जाते व बळजबरीने काम करून घेतले जात असल्याचा आरोप आशा सेविकांनी यावेळी केला आहे.