नेशन न्यूज मरठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – बिल्डिंगच्या ड्रेनेज पाईपद्वारे वर चढून घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दहिसर पश्चिममधील म्हात्रेवाडीतील अर्पिता अपार्टमेंट मध्ये येथे स्पायडरमॅन स्टाईलने वर चढून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी श्रीमती श्वेता टेकचंद वीरा यांच्या म्हणण्याप्रमाणे, रात्रौ झोपलेले असताना रात्री 2च्या दरम्यान त्यांना अचानक जाग येऊन पाहिले असता त्यांना त्यांच्या घरात कपाटाजवळ एक इसम चोरी करताना दिसून आला. त्यावेळी त्यांनी घरातील लाईट लावली असता चोरी करणाऱ्या इसमाने भीतीने घाई बडबडीने फिर्यादीच्या स्वयंपाकाच्या घराच्या खिडकीमधून खाली उडी मारली व तेथून पळून गेला.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुर्यकांत पवार, पोउनि अखिलेश बोंबे व पथक यांनी नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी केली. यात त्यांना इमारतीच्या स्वयंपाकाच्या खिडकीच्या खाली दोन दात तुटलेले आढळून आले. तसेच समोरच्या भिंतीवर देखील रक्त लागल्याचे दिसून आले. इमारतीचे सी.सी.टी.व्ही पाहिले असता वय वर्ष 25 ते 30 वयोगटातील एक इसम हा इमारतीच्या ड्रेनेज पाईपावरून दुसऱ्या मजल्यावर चढलेला व त्यानंतर पाईपवरून खाली येत असताना तोल जावून पडल्याचे निदर्शनास आले.
हाच धागा पकडून पोलिसांनी दहिसर ते चर्चगेट व दहिसर ते विरार असे जवळजवळ 700 ते 800 हॉस्पिटलची पाहणी केली असता आरोपीत इसम हा सांताक्रुज पश्चिम येथील रामकिशन हॉस्पिटल येथे औषधउपचार घेत असल्याचे समजले. वरिष्ठांच्या पोलिसांनी सल्लामसलतीने आरोपीवर दररोज पाळत ठेवण्यात आली. आरोपीची प्रकृती ही सुव्यवस्थेत असल्याची खात्री झाल्यावर त्याला दहिसर पूर्व मधून अटक करण्यात आली.
रोहित राठोड,वय 29 नामक या आरोपिताला राहत्या घरातून अटक करण्यात आली. तसेच 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. यापूर्वी देखील आरोपितावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.